पहाटवारा बागेमध्ये कळ्याफुलांशी खेळत होता ।
कुणी बिचारा त्या समयाला अखेरचे क्षण मोजत होता ॥
तुझ्या नी माझ्या भेटीमधल्या गोष्टी मज ना आठविती ।
मला स्मरे इतकेच निळा घन रिमझिम रिमझिम बरसत होता ॥
अबोल अस्फुट मुग्ध अशी ती कळी न फुलली वेलीवरती ।
तिला न कळले वसंत दुरुनी तिला कधीचा खुणवत होता ॥
तुला ‘शशी’ ना कळले त्याच्या मनातले ते भाव कधीही ।
जयावरी तू प्रीती केली, प्रिया तुला तो मानत होता ॥
अबोल दोघे जवळ असूनी उमटत नव्हते शब्द मुखातून ।
टळून गेली भेटीवेळा… चंद्र तुला समजावत होता ॥
शशिकला.