एकली
धारांच्या तालावर नाचणाऱ्या मोराला सांगितलं कितीदा नको रे नाचू... प्रत्येक पाऊल तुझं गवतावर पडणारं जिवावर पडतं अन् लागतं बोचू ...
मीच जेव्हां मला अनोळखी बनते,
तेव्हां आठवणींच्या पाऊलवाटा तुडवत ओळखीच्या प्रवेशव्दारांकडे चालत रहाते…
ती सर्व दार बंद असतात ,
त्या खिडक्या बुजवलेल्या असतात ,
ते झरोके मालवलेले असतात ,
प्रकाशाची एकही तिरीप दिसत नाहीं कुठे ,
माझी ओळख मला पटायची कशी ?
सांगा कुणीतरी कोण आहे मी ?
बोला कुणीतरी …
काय आहे माझं व्यक्तित्व ?
अचानक हजारो शब्दांचा कोलाहल कानी पडतो …
तू अशी ! तू तशी ! तूं तीच ! तूं वेगळीच …
आणि त्या गोंगाटात स्वतःची ओळखच काय… पण माझे अस्तित्वही हरपते !
अस्तित्वही हरपते !
शशिकला.