Original Poems

कवचकुंडल

Published on April 15, 2026

भर उन्हाळी , पावसाळी गीत तू गाऊ नको 

पार क्षितिजा पोचल्यावर साद तू घालू नको ॥

जे कधी म्हटलेच नाही, तेही आहे जाणुनी

बरसणारा मेघ ना , नुसताच तू गरजू नको ॥

शीड आहे फाटलेले, ना सुकाणू, ना दिशा

भंगल्या नावेस नाविक आज तू होऊ नको ॥

आग शरीरी पेटली सात्त्विकतेची दहकती

शिंपण्याला मृगजळाचे थेंब तू येऊ नको ॥

फुलून आली रातराणी साद देते राजसा 

या क्षणी ताटातुटीचे गीत तू गाऊ  नको ॥

जीवनाच्या शेवटाला मीलनाची ये घडी  

पांघरोनी संयमाला आज तू जाऊ नको ॥

दैववादी मी न पण दुर्दैव येई माहिती 

म्हणत मजला प्राक्तनाचे भोग तू टाळू नको ॥

घालण्या विळखा सुगंधा सर्प फिरती जागजागी

बकुळ चन्दन पुष्पमाला आज तू लेऊ नको ॥

शस्त्र अस्त्रे या जगी मोकाट सुटुनी धावती 

ठेव जपुनी कवचकुंडल, दान तू देऊ नको ॥

शशिकला.