Original Poems

काही फुले सुगंधी…

Published on April 15, 2026

काही फुले सुगंधी, काही कळ्या विषारी 

बागेत या जगाच्या नाना परी कटारी ॥

केल्या चुका हजारो, नाही क्षिति परंतू 

शिक्षा मला मिळाली प्रीतीतल्या जुगारी ॥

हे झाड बाभळीचे मी लाविले उरी या 

काट्यात साठलेला ज्याच्या मधू विषारी ॥

बेहोष त्या क्षणाला सर्वस्व अर्पिले मी 

सारी जगें मिळाली होऊनिया भिकारी ॥ 

झेलून वादळे ती सिंधूस जिंकिले मी 

नौका बुडून गेली येऊनिया किनारी ॥ 

का यामिनीत येती लाखो रवी फुलोनि

माझ्या घरात का हा अंधार भर दुपारी ॥ 

गेले तुटून पडदे , वैराण सूर झाले 

हातात राहिल्या या ताराविना सतारी ॥ 

वेडे हरीण विद्ध पाही वळून मागे 

एका क्षणात मृत्यू देईल तो शिकारी ॥

केलीस वंचना तू ध्यानी परी असू दे

इश्कात हारण्याची रे वेगळी खुमारी ॥ 

ज्या मित्र मानिले मी त्यानेच आज कैसा 

मागून वार केला जो पोचला जिव्हारी ॥

शशिकला