Original Poems

ही कुठे नेणार मजला वाट आहे

Published on April 15, 2026

भोवती काळोख आता दाट आहे 

ही कुठे नेणार मजला वाट आहे ॥

कारणे सांगू नको तू वंचनेची, 

जाणते मी, ही तुझी पळवाट आहे ॥

ना कुठेही मज किनारा साद घाली,

मी अवेळी उसळलेली लाट आहे ॥

वाट बघुनी श्रांतले रे या ठिकाणी,

सोबतीला एक पडका घाट आहे ॥

या उभ्या गावात फिरुनी पाहिले मी 

ना कुणीही फक्त हा मरुघाट आहे ॥

पंख उडत्या पारवराचे छाटुनी ते

सांगती घे झेप पुढती वाट आहे ॥

ना कधी करणार परक्यांची स्तुति मी 

गीत गाणारा, तुझा मी भाट आहे ॥

सज्जनांना टाकुनी ते दुर्जनांना वानिती 

दुष्ट दुनियेची अशी वहिवाट आहे ॥ 

पश्चिमेच्या सूर्याबिम्बा पाहतांना 

शापितांचा वाटतो सम्राट आहे ॥

शशिकला