Original Poems

या जगाची रीत विपरित

Published on April 15, 2026

या जगी खोटीच मूल्ये मज जपावी लागली,  

शेवटी माझीच गीते मज विकावी अगली ॥

जोजवीले या करांनी, ललन केले मी जीचे ,

ती कळी माझ्याच हाती मज खुडावी लागली ॥

यातनांची पालखी जी तुडविली पायातळी,

नाईलाजाने पुन्हां ती मज पुजावी लागली ॥

पारध्याची पाहुनी ती अदयता त्या ऋत्विजा,

पुण्यवाणी अनवधानी श्रापवावी लागली ॥

या जगाची रीत विपरित बघुन मी चक्रावले,

डोळियाची पापणी ही मज शिवावी लागली ॥ 

पेरलेली बी बियाणे उगवुनी आल्यावरी,

बेगडी रुपे पुन्हा ती मज पुरावी लागली ॥

शांतवाया येऊनी केलास का आकांत तू ,

यामुळे दुःखे तुझीही मज गिळावी लागली ॥

शशिकला