Original Poems

चार भिंती या जगाच्या सोबती

Published on April 15, 2026

चार भिंती या जगाच्या सोबती, आसरा कोणास आता मागती ।

संपले तेव्हाच मी जेव्हा कधी, मित्र आले दुश्मनांच्या संगती ॥

टाकली तोडून आता पैंजणे, नादवलये ही कशाला भोवती ।

मी प्रकाशा या घरी बोलाविले आणि खिडक्या बंद साऱ्या तापती ॥

नाव सांगुन फूलपंखी कोण ते, रोज सुमनांच्या सुगंधा चोरती।

रोप ज्यांनी एकही ना लाविले, हक्क ते साऱ्या फुलांवर सांगती ॥

गाव जरि हा वेढलेला त्या ढगांनी , या जमीनी ताहनेल्या राहती।

या उभ्या जखमा समोरी स्वागता, ती सुखे लांबून मजला बाहती॥

त्या कमानीतून जे ना मारले, लक्षवेधी बाण ते मज विंधिती ।

काल जे यादीत होते मृत्यूच्या, आज ते सुखरूप कैसे राहती ॥

दुःख हे हृदयात घेऊन चालता, ओठ तुझिया कारणे हे हासती ।

साजरा सत्कार केला कालचा, देऊनी हातात जळती ज्योत ती ॥

पूर्ण झाला पांडवांचा सूड तरीही, कोण फिरतो जखम घेऊन वाहती ।

काल ज्यांना मी भुकेले पाहिले, आज ते भिक्षा दुजांना घालती ॥

कस्तुरीचा गंध येतो कोठुनी, ना कळे मृग चौ दिशांना धावती ।

थांबूनी रस्त्यात तुझिया कैकदा, पाहिली अमुचीच आम्ही वाट ती ॥

शाकिकला