एकली
धारांच्या तालावर नाचणाऱ्या मोराला सांगितलं कितीदा नको रे नाचू... प्रत्येक पाऊल तुझं गवतावर पडणारं जिवावर पडतं अन् लागतं बोचू ...
चेहरा यातील ना येईल कामा, आरसा ? छे! हा फक्त पाऱ्याचा मुलामा ॥
काळ गेला हातचा केव्हा सुटोनी, शोक कसला आज करता हा रिकामा ॥
सवय काटेरी तृणांची पावलांना, आज रुततो पायी मखमाली रुजामा ॥
भटकले जगती अशी की मज अखेरी, वाट पुसते जायचे तुज कोण गामा ॥
ज्यावरी मी टाकिला विश्वास ते ही, करून गेले यातनांचा पंचनामा ॥
स्वप्न घेऊन पापण्यांवर मीलनाचे, वेदना सोशीत जळते एक शामा ॥
शशिकला.