Original Poems

साऱ्या भिंती

Published on April 15, 2026

पुसून टाका लडबडलेल्या त्या बेपरवा साऱ्या भिंती ।

नव्या युगाच्या आव्हानांनी फिरून सजवा या भिंती ॥

कळी अनाराची जर चिणली अन्यायाने आज इथे तर ।

करतिल  धावुन एकजुटीने विरोध कडवा सा-या भिंती ॥

चला चला हो सर्व मिळुनिया कार्यारत व्हा एकमताने ।

अधल्यामधल्या दूरत्वाच्या खुशाल निजवा साऱ्या भिंती ॥

युग पुरुषाने अंदमानच्या काय पचवले धीटपणाने ।

 किती सोसले मूकपणाने  करती गवगवा साऱ्या भिंती ॥

जरा जपूनी बोला तुम्ही, सावधतेने चाला तुम्ही।

सभोवताली उभ्या पांघरून रंग भगवा साऱ्या भिंती ॥

शशीकला.