Original Poems

कोणती होती दिशा ती

Published on April 15, 2026

जीवनाशी पैज घ्याया लागला, श्वास आता अडखळाया लागला ॥

वाढला निवडुंग जेव्हा भोवती, मोगरा तेव्हा फुलाया लागला ॥

कोणती होती दिशा ती वेगळी, सूर्य जेथे ढासळाया लागला ॥

चालता वाटेवरी काट्यातुनी, कोण पंचम आळवाया लागला ॥

तो दिसे मुक्काम डोळ्यांच्या पुढे, प्राण अन् येथे ढळाया लागला ॥

काय सैताना तुझा हा न्याय रे, पुत्र आईला विकाया लागला ॥

ज्या कुणा वैरीच होते मानले, आज मज तो आवडाया लागला ॥

शाल प्रेमाची कुणी वेडा खुळा, कंचनीवर पांघराया लागला ॥

निवडूनी येऊन सत्तेवर पुन्हा, मर्कटी लीला कराया लागला ॥

लावलासी चन्दनाचा लेप तू, जीव परि अजुनी जळाया लागला ॥

करबल्याच्या धूळभरल्या संगरी, हसन कोणी तडफडाया लागला ॥

आसवे वा घर्मबिंदू काय की, पदर वदनावर भिजाया लागला ॥ 

जमवुनी नाणी हजारो ठेवली, अन् खिसा तो खुळखुळाया लागला ॥

झोपडीमाजी सुखाने राहुनी, शहर सारे जागवाया लागला ॥

बन्द सारे कारखाने येथले, धूर मग कोठे निघाया लागला ॥

वाचली कवने सुरावर जेधवा, प्रत्येकजण पाया पडाया लागला ॥

भेट शेवटची शशी’ ही आपुली, भैरवीचा स्वर घुमाया लागला ॥

शशीकला.