Original Poems

निःसंग

Published on April 15, 2026

मैफलीचा रंग हो तू, काळजात तरंग हो तू ॥

पौर्णिमेच्या चांदराती, मदनरूप अनंग हो तू ॥

घे पिऊनी आज मदिरा, मग उद्या निःसंग हो तू ॥

नाव घेऊन भर समुद्री, उसळता सारंग हो तू ॥

पांचजन्या फुंकणारा, आजचा रणरंग हो तू ।।

रंग टाकुन पश्चिमेचे, येथला  सत्संग हो तू ।

न्यायधर्मा रक्षणारा, कालकूट भुजंग हो तू ॥

ज्योतिलाही जाळणारा, आगळाच पतंग हो तू ॥

अपयशाला दूर करुनी, यक्षगानी दंग हो तू ॥

शशीकला.