Original Poems

आस  

Published on April 15, 2026

बोल नयनांचे कसे तुज उलगडावे,

जागुनिया रातभर मी तळमळावे ॥

वाट आपण निवडलेली चालताना,

टोचता काटे कशाला हळह‌ळावे ॥

दूर झाले जीवनातून मी तुझ्या रे,

माझिया दारात तू ना घुटमळावे ॥

दुःख कायमचेच माझ्या सोबतीला,

एकदा तरी जीवनी सुख डोकवावे ॥

जीव तोडून प्रीत केली ज्या घनांवर,

तेच घन का वर्षता घर कोसळावे ॥

सायलीच्या मांडवाखाली बसोनी,

तू नी मी कानी उखाणे कुजबुजावे ॥

आस  माझ्या मानसी ही एक आहे,

बद्ध करपाशी तुझ्या मी विरघळावे ॥

तो वसंत न आज उरला जीवनी या,

अंतरी तू अजून ‘शशी’ का परिमळावे॥

शशीकला.