Original Poems

एकली

Published on May 15, 2026

धारांच्या तालावर नाचणाऱ्या मोराला 

सांगितलं कितीदा नको रे नाचू…

प्रत्येक पाऊल तुझं गवतावर पडणारं 

जिवावर पडतं अन् लागतं बोचू

 

घनगंभीर मेघांना,  खळाळत्या ओघांना 

विनवलं अनेकदा वेग करा कमी…

पहाताना पाऊस हा थरारे जीव माझा 

सजण दूर गेला एकली इथे मी…

 

कुहूक टाहो ग नकोस फोडू गं 

सलतो उरी गं कंठीचा पंचम…

अशा या अवेळी, कातर सायंकाळी 

शिणवू नको गळी तरल सरगम…

शशीकला.