Original Poems

ओळख

Published on April 15, 2026

मीच जेव्हां मला अनोळखी बनते, 

तेव्हां आठवणींच्या पाऊलवाटा तुडवत ओळखीच्या प्रवेशव्दारांकडे चालत रहाते…

 

ती सर्व दार बंद असतात ,

त्या खिडक्या बुजवलेल्या असतात ,

ते झरोके मालवलेले असतात ,

प्रकाशाची एकही तिरीप दिसत नाहीं कुठे ,

 

माझी ओळख मला पटायची कशी ?

सांगा कुणीतरी कोण आहे मी ?

बोला कुणीतरी

काय आहे माझं व्यक्तित्व ?

 

अचानक हजारो शब्दांचा कोलाहल कानी पडतो

तू अशी ! तू तशी ! तूं तीच ! तूं वेगळीच

आणि त्या  गोंगाटात स्वतःची ओळखच काय… पण माझे अस्तित्वही हरपते ! 

अस्तित्वही हरपते  !

शशिकला.